ठाणे : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या २१ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यातील पाचपाखाडीतील दांडेकरवाडी भागात गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या तरुणीची ठाण्यात राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाशी मैत्री झाली होती. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला होता. तिने वारंवार लग्नाचा आग्रह केल्यानंतरही त्याच्याकडून मात्र नकार येत होता. यातून ती गेल्या काही दिवसांपासून वैफल्यग्रस्त झाली होती. ती एका खासगी क्लासेसमध्ये नोकरी करीत होती. मित्रासोबत लग्न करण्याचा मानस तिने कुटुंबीयांकडे व्यक्त केला होता. तो मात्र लग्नासाठी टाळाटाळ करीत असल्याने तिने दांडेकरवाडीतील आपल्या आत्याच्या घरातील बेडरूममध्ये ओढणीने गळफास घेतला. बराच वेळ होऊनही ती बाहेर न आल्यामुळे हा प्रकार समोर आला. मित्राने दिलेल्या लग्नाच्या आश्वासनानंतर तिने आपल्या हातावर सूरजअसे नावही गोंदले होते, असा आरोप आता तिच्या आईवडिलांनी केला आहे. आईवडिलांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठाण्यातील टेकडी बंगला भागात राहणाव्या सूरज शिर्के याच्याविरुद्ध दाखल केला.
प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या
• SHARVIKA WARANGE